पारोळा, दि.०९ – तालुक्यातील शिवरे गावात शनिवारी शेतातील अशुद्ध पाणी पिल्याने २९ मजूरांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आलायं. दरम्यान सर्व रूग्णांवर पारोळा कॉटेज रूग्णालय यशस्वी उपचार सुरू असून सर्व रूग्णांची प्रकृती आता स्थिर आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत घटनेची इत्यंभूत माहिती जाणून घेतली. रूग्णांवर तात्काळ मोफत उपचार करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गटविकास अधिकारी यांना तात्काळ सूचना निर्गमित केल्या.
घटनेचे गांभीर्य ओळखत गटविकास अधिकारी किशोर शिंदे घटनास्थळी पोहचत परिस्थितीचा आढावा घेतला. शिवरे गावात मध्यप्रदेश हून शेतमजूरीसाठी आलेल्या या २९ जणांनी शेतातील एका ड्रममध्ये अनेक दिवसापासून साचलेले पाणी पिल्याने विषबाधा झाली असावी असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. २९ जणांपैकी २ जणांवर तामसवाडी आरोग्य केंद्रावर उपचार सुरू आहेत.
तालुका आरोग्य अधिकारीसह गटविकास अधिकारी कॉटेज हॉस्पिटल येथे उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. गावातील पाणी नमुने आरोग्य सेवकांनी घेतले आहेत. आमदार चिमणराव पाटील यांनीही रूग्णालयात रूग्णांची भेट घेत विचारपूस केली आहे.