जळगाव, दि. २८ – राज्यातील महापालिका मालमत्ता भाडेपट्टा नूतनीकरण अथवा हस्तांतरण करण्यासाठी प्रारूप नियम शासनाच्या नगरविकास विभागाने गुरुवारी प्रसिद्ध केले. जळगाव शहरातील महापालिकेच्या व्यापारी संकुलातील दोन हजार ३६८ गाळेधारकांचा भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता.
दरम्यान आमदार सुरेश भोळे यांनी शासनाकडे सततच्या पाठपुराव्या मुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गाळेधारकांच्या भाडेपट्टा निश्चित व गाळे नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून व्यापाऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे.
शासनाच्या नवीन अध्यादेशामुळे महानगरपालिका व्यापारी संकुलातील गाळेधारकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला आहे. गाळ्याचे भाडेपट्टा बाजार मूल्य आठ टक्क्यांवरून तीन टक्के करण्यात आला. आठ टक्क्यांच्या अवाजवी मूल्याबाबत व्यापाऱ्यांत नाराजी होती, ती नाराजी आता दूर झाली आहे.
शहरातील फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केट मधील व्यापाऱ्यांनी गाळ्यांचा प्रश्न सुटल्याबाबत समाधान व्यक्त केले. दरम्यान आमदार सुरेश भोळे यांची भेट घेऊन सत्कार केला. यावेळी रमेश मतानी, बाबूशेठ कौरानी, राजेश वरयानी, बबलू समदडीया, विशाल कुकरेजा, विशाल कुकरेजा, मनीष कुकरेजा, आदी व्यापारी बांधव उपस्थित होते.
व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा प्रश्न आता सुटल्याने महापालिकेचे नुकसान होणार नसून गाळेधारकांनाही दिलासा मिळेल, शासन निर्णयाचे स्वागत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्यामुळे यश मिळाले आहे. आता राजकारण न करता शहराच्या विकासासाठी सर्व मिळून प्रयत्न करूया असे आवाहन आमदार सुरेश भोळे यांनी केले.