जळगाव, दि. ३० – येथील एल.जी. महाजन यांची चित्रे जागतिक दर्जाची असून स्वातंत्र्यपूर्व काळात खान्देशात चित्रकारांच्या पिढ्या घडवण्याचं काम त्यांनी केले. अशा भावना परिवर्तन चित्र साक्षरता कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केल्या. जुन्या काळातील सुप्रसिद्ध चित्रकार एल.जी. महाजन यांचे ‘लक्ष्मण ते लक्ष्मण’ हे चित्र प्रदर्शन रिंग रोडवरील कलादालनात लावण्यात आले असून ३१ ऑक्टोबर पर्यंत चित्र प्रदर्शन खुले राहणार आहे. यानिमित्त परिवर्तन चित्र साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले.
अमुर्त चित्र कशापद्धतीने समजून घ्यावी, त्यातील भाव, रंग, विचार हे सारं काही सहज सोपं आणि साध्यापद्धतीने तज्ञ चित्रकारांच्यावतीने रसिक प्रेक्षकांशी संवाद साधणारा हा परिवर्तन साक्षरता उपक्रम असतो. याचाच एक भाग म्हणून चित्रकार एल जी महाजन सरांच्या चित्रप्रवासाविषयी व चित्रांतील गुणवैशिष्ट्यांवर परिवर्तनतर्फे चर्चा आयोजित करण्यात आली होती.
यात प्रसिद्ध चित्रकार राजू बाविस्कर, विजय जैन, अतुल मालखेडे, विकास मल्हारा, नितीन सोनवणे, शाम कुमावत, डॉ प्रसन्न महाजन यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी राजू बाविस्कर यांनी महाजन यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य विशद करतांना त्याकाळातील त्यांचं थोरपण सांगीतलं. अतुल मालखेडे यांनी कला समजून घेणे ही काळाची गरज असून माणसाला माणसाशी जोडण्याचं काम कला करत असते आणि परिवर्तन यात पुढाकार घेऊन काम करत असल्याचे मनोगत व्यक्त केले.
नितीन सोनवणे यांनी कलेचं मुल्य समजून घेणारी पिढी घडणं गरजेचं असून वास्तववादी चित्रातही अमुर्तता असते, सत्य बघणं, निरीक्षण क्षमता वाढली पाहिजे असे विचार मांडले. विजय जैन यांनी मी महाजन सरांना कधी भेटलो नाही पण त्यांच्या चित्रातून त्यांची भेट झाली. चित्रकार हा त्याच्या चित्रातून कलेचा इतिहास घडवत असतो असे विचार मांडले. शाम कुमावत, विकास मल्हारा यांनीही चित्रांविषयी सांगितले.
डॉ प्रसन्न महाजन यांनी महाजन सरांच्या आठवणी सांगितल्या. जितेंद्र सुरळकर पिसूर्वो या चित्रकार मित्राच्या पुढाकारातून हे प्रदर्शन होत असल्याचं महाजन यांनी सांगितले. कार्यक्रमाला परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील, चित्रकार सचिन मुसळे, सुशील चौधरी, पंकज वानखेडे यांच्यासह अनेक चित्रकार व एल जी महाजन यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.