जळगाव, दि.२६ – शहरात दीपावली निमित्त स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे बुधवारी महात्मा गांधी उद्यानाच्या कस्तुरबा रंगमंचावर मान्यवरांच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने मैफल सजली. कलाकार होती चेन्नई येथील तरुण आश्वासक गायिका दीपिका वरदराजन. वरून नेवे यांच्या गुरुवानदानेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कलाकार दीपिका वरदराजन, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, डॉ. राहुल महाजन , मेजर नाना वाणी, महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते दिपप्रजवलन संपन्न झाले.
दीपिकाने आपल्या मैफिलीची सुरवात राग ललत ने केली. विलंबित एकतालात निबद्ध “गुरू ही आये” तर छोटा ख्याल तीन तालात निबद्ध “भवंदा या नंदा जो बन” “मोरा सैया बुलाई नदिया आधी रात” ही ठुमरी सादर केली. यानंतर दीपिकाने देस रागातील सं. मानापमान नाटकातील गोविंदराव टेम्बे यांनी संगीतबद्ध केलेले “शुरा मी वंदिले” हे नाट्यपद सादर केले. त्यानंतर सं. सौभद्र या नाटकातील अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी संगीतबद्ध करून पं. प्रभाकर कारेकर यांनी गाऊन अजरामर केलेले ” प्रिये पहा, रात्रीचा समय सरूनी” हे नाट्यपद सादर केले.
“रसमे उलफत को निभाये कैसे” या गीतानंतर भैरवी ने मैफिलीची सांगता झाली. तबल्यावर नाशिकच्या गौरव तांबे, संवादीवर पुष्कराज भागवत यांनी साथ केली. तानपुऱ्यावर अथर्व मुंडले व वरुण नेवे यांनी साथ केली. दिपक चांदोरकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रसन्न भुरे, अथर्व मुंडले, वरुण नेवे, आशिष मांडे, निनाद चांदोरकर, वरुण देशपांडे, स्वानंद देशमुख यांनी परिश्रम घेतले.