पुणे, दि.०२ – श्री शिवराय खान्देश मराठा मंडळाच्यावतीने महाराष्ट्र दिनानिमित्त नुकताच पुण्यात कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते वना उखर्डू मराठे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खान्देशासह इतर जिल्ह्यातुन कामानिमित्त पुणे शहरात स्थायिक झालेल्या समाज बांधवांना एकत्रित आणण्याचे काम मराठे यांनी केले आहे.
सन १९६८ साला पासुन पुण्यात वास्तव्यास असलेले वना मराठे यांचे मुळ गाव जळगाव जिल्ह्यातील एरंडोल हे आहे. जुनी मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण त्यांनी मुळगावी घेतले. त्या नंतर पुढील शिक्षणासाठी शिक्षणाचे माहेरघर जमजले जाणारे शहर पुणे गाठलं आणि बी.ए. पर्यंतचे शिक्षण नोकरी करत पुर्ण केलं. पुण्यात नॅशनल इंन्शुरन्स कंपनीत सहाय्यक अधिकारी (AAO) म्हणून काम पाहत असताना अनेक लोकांशी संपर्क येत होता. त्यातल्या त्यात गावाकडचा माणूस भेटला की त्यांना आपलं वाटायचं, त्याची आस्थेवाईक चौकशी करून त्याचा पत्ता, फोन नंबर ते घेत असत.
सुरुवातीच्या काळात सुर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज बांधवांची संख्या पुणे शहरात अगदीच नगण्य होती. दरम्यान १९९६ साली मराठे यांनी श्री शिवराय खान्देश मराठा मंडळाची स्थापना केली. आणि मंडळाचे संस्थापक अध्यक्ष या नात्याने समाज बांधवांना एकत्रित आणण्याचे काम त्यांनी सातत्याने केले.
सन २००४ साली त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली असून ते आजही समाज मंडळाच्या कार्यात सक्रिय असतात. यासाठी पत्नी शांताताई मराठे यांच्यासह परिवाराचे सहकार्य लाभते. मंडळाच्या स्थापनेपासून ते आजतागायत मंडळाशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल व समाज एकत्रीकरणासाठी विशेष परिश्रम घेतल्यामुळे वना उखर्डू मराठे यांना श्री शिवराय खान्देश मराठा मंडळाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय सूर्यवंशी क्षत्रिय मराठा मंडळ, जळगाव चे संचालक दिनकर पाटील, श्री शिवराय खान्देश मराठा मंडळाचे अध्यक्ष दिनेश ताराचंद पाटील, उपाध्यक्ष मुकेश दगडू महाजन, सचिव प्रविण विलास चौधरी, खजिनदार राजेश माधवराव महाजन आदी मान्यवरांसह पदाधिकारी, परिवारातील सदस्य आणि समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते. दरम्यान नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्टांकडून वना मराठे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.