जळगाव, दि.२१- पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल ‘एनर्जी अँड एनव्हायर्मेंट फाऊंडेशनतर्फे ‘ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड ‘ ऑनलाईन पद्धतीने 21 रोजी प्रदान करण्यात आला. ऊर्जा व पर्यावरण फाउंडेशनचे हे व्हर्च्युअल फोरम असून त्यांनी दोन दिवसांची पाचवी जागतिक जलशिखर परिषद आयोजिली आहे. जैन इरिगेशनच्या पर्यावरण व पाण्याच्या संदर्भात केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याला अधोरेखित करून हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी स्वीकारला.
जल व्यवस्थापनातील नावीण्यपूर्ण तंत्रज्ञान, नवीन संशोधन म्हणजे स्मार्ट वॉटर मॅनेजमेंटचा उपयोग करून समाजाला विकासाच्या मार्गावर आणण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या संघटनांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्या कार्याबद्दल गौरवार्थ दी एनर्जी अँड एन्व्हायन्मेंट फाउंडेशन (EEF) या जागतिक संस्थेतर्फे हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड 2021 स्विकारतांना असे सांगितले त्यांना पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद झाला. हा पुरस्कार म्हणजे जैन इरिगेशनचे संस्थापक श्री भवरलालजी जैन यांच्या दुरदृष्टीने आणि मार्गदर्शनाखाली केलेल्या चार दशकांहून जास्त काळात अल्पभूधारक शेतकऱ्यांना जैन उच्च कृषी तंत्रज्ञानामुळे केलेल्या कार्याची पावतीच आहे. त्यांनीच हा पुरस्कार अल्पभूधारक शेतकऱ्यांना केलेल्या तंत्रज्ञानामुळे सूक्ष्म सिंचन करता आले आणि त्यांच्या पिकांच्या उत्पादनात भरीव वाढ करता आली अशा शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. या शेतकऱ्यांना मूल्य वृद्धी करता आली आणि त्याचा चांगला परिणाम म्हणजेच अशा शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडले. श्री. अनिल जैन यांनी जैनच्या भात (तांदूळ) शेतीतील उच्च नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानामुळे व ठिबक सिंचनातून कमी पाण्यात खूप उत्पादन घेता आले आणि हे जैन इरिगेशनने सिद्ध करून दाखविले.
सदर पुरस्कार श्री. अनिल जैन यांनी ऑनलाईन स्वीकारला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या वकीलातीतील आदरणीय उच्चायुक्त श्री बॅरी ओ’ फॅरेला ए. ओ., आदरणीय मार्टेन व्हॅन डेन बर्ग, राजदूत, नेदरलॅंड्स, आणि डॉ. व्ही. के. गर्ग, माजी व्यवस्थापकीय संचालक पॉवर फिनान्स कॉर्पोरेशन लि. आणि अनिल राझदान, माजी सचिव (ऊर्जा), भारत सरकार आणि अध्यक्ष एनर्जी अँड एनव्हार्यमेंट फाऊंडेशन हे इतर मान्यवर अतिथी उपस्थित होते.