जळगाव, दि.१३ – गांधीजींच्या कान्हदेश तीर्थयात्रेत स्वराज्याची प्रेरणा होती. खादीचा प्रचार-प्रसार, स्त्रीशक्ती जागरण, अस्पृश्यता विरोध, विद्यार्थी प्रबोधन व गोशाळा-पांझरापोळ भेट या पंचसूत्रीद्वारे समाजाला निर्भय बनवीत स्वराज्यासाठी प्रेरणा देण्याचे काम गांधीजींनी आपल्या कान्हदेशच्या तीनही भेटीतून केलेले दिसते असे प्रतिपादन गांधी विचारांचे अभ्यासक व सुप्रसिद्ध लेखक प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांनी केले. गांधी रिसर्च फाउंडेशन आणि धनाजी नाना महाविद्यालयाचे महात्मा गांधी अभ्यास आणि संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “कान्हदेशात गांधी” या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधींचे पणतू व गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक तुषार गांधी होते.
गांधीजींच्या सर्वधर्म प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका विशद केली. विषयांची मांडणी करतांना डॉ. विश्वास पाटील म्हणाले कि, गांधीजींनी १९२१, १९२७ व १९३६ अशा तीन वेळा कान्हदेशात भेटी दिल्यात. १९२१ साली लोकमान्य टिळकांच्या स्मृतीप्रित्यर्थ निर्माण करण्यात आलेल्या टिळक स्वराज्य कोषासाठी पहिली भेट दिली. स्वराज्य हे आत्मतत्व असलेल्या लोकमान्य टिळकांचा आत्मा तुम्ही स्वराज्यासाठी काय करू इच्छिता असे विचारतो आहे असे आवाहनही त्यांनी केले.
१९२७ साली ९ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या कालखंडात गांधीजींनी कान्हदेशात अनेक गावांना भेटी दिल्यात. तेथे प्रत्येक ठिकाणी प्रार्थना सभा, सुत यज्ञ हे कार्यक्रम अखंडपणे सुरु होते. त्यांच्या या भेटीत पाचोरा, शेंदुर्णी, नेरी, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर (एदलाबाद), वरणगाव, भुसावळ, रावेर, जळगाव, पिंप्राळा, एरंडोल, धरणगाव, चोपडा, अमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा, शहादा, मालपूर, साक्री, धुळे, निजामपूर, नेर, कुसुंबा आदी ठिकाणांचा समावेश होता. या सर्व ठिकाणी गांधीजींचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यांना काही ठिकाणी सन्मानपत्र देण्यात आली, यात विशेष करून त्यांनी जळगावच्या मानपत्राचा उल्लेखही केला.
तसेच ठिकठिकाणी हरिजन फंडासाठीचा निधी संकलित करण्यात आला. त्यात श्रमिकांनी दिलेला निधी मला सोन्याचा वाटतो असे गांधीजींनी म्हटले होते. आपल्या मनोगतात गांधीजींच्या तिसऱ्या ऐतिहासिक भेटीचे वर्णन करतांना दीड लाख लोकांच्या सहभागाने महात्मा गांधीजींच्या नेतृत्वात यशस्वी झालेल्या फैजपूर काँग्रेस अधिवेशनाच्या आठवणी डॉ. विश्वास पाटील यांनी जागविल्यात. हे अधिवेशन भारतीय स्वातंत्र्यासाठीची प्रार्थना आहे असे प्रतिपादन महात्मा गांधींनी केले होते त्यामुळेच भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात या अधिवेशनाचे विशेष महत्व आहे.
गांधीजींच्या या भेटीत अॅड. व्ही. व्ही. दास्ताने, रामेश्वरदास पोतदार, श्रीपादशास्त्री पथक, शंकरराव देव, भोगे यांच्याशी ऋणानुबंध निर्माण झाले होते. अध्यक्षीय समारोपात तुषार गांधी यांनी शहरी भागातील काँग्रेसला गांधीजींनी गावखेड्यापर्यंत पोहोचविले व त्याद्वारे संपूर्ण समाजाचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग झालेला आपल्याला दिसतो. गांधीजींच्या जीवनात कस्तुरबांचा सहभाग लक्षणीय असून त्याला नजरअंदाज करून चालणार नाही असे प्रतिपादनही त्यांनी केले. कान्हदेशचा गांधी हत्येशी संबंध असल्याची एक किनार असल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले.
कार्यक्रमास गांधी रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर, संचालक डॉ.सुदर्शन अय्यंगार, तापी परिसर शिक्षण मंडळाचे सचिव प्रभात चौधरी, डॉ.जगदीश पाटील, समन्वयक उदय महाजन, सहयोगी प्राध्यापक अश्विन झाला यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश कुळकर्णी यांनी केले तर चंद्रशेखर पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे रेकॉर्डींग @gandhiteerth च्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे.