जळगाव, प्रतिनिधी : शाश्वत आणि आधुनिक शहर विकासासाठी मुंबईत आयोजित ‘थर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट २०२६’ या जागतिक परिषदेत जळगावच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांनी सहभाग घेतला. या निमित्ताने त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तसेच विविध देशांच्या महापौरांशी संवाद साधता आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात शहरांना ‘विकासाची इंजिने’ संबोधत स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अधोरेखित केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू व मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थित होत्या.

पहिल्या दिवशी महापौर काळे यांनी ‘अर्बन इंडिया @ २०४७’ (भविष्यातील शहरी विकास), ‘मेयर्स राउंड टेबल टॉक’ (स्थानिक स्वराज्य संस्थांसमोरील आव्हाने) आणि ‘शहरी कचरा व्यवस्थापन व सर्क्युलर इकॉनॉमी’ (कचऱ्याचा पुनर्वापर) या तीन सत्रांमध्ये सहभाग घेत तज्ज्ञांचे धडे घेतले.
या जागतिक परिषदेतील आधुनिक कार्यपद्धती आणि मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन जळगाव शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि नियोजनबद्ध करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास महापौर दीपमाला काळे यांनी व्यक्त केला आहे.








