जळगावच्या पाटील कुटुंबाला गुजरातमध्ये कालव्यात फेकले; तिघांचा मृत्यू, दोन मुले बेपत्ता

कामाच्या शोधात सुरतकडे जाताना चार जणांनी अडवले; १३ वर्षीय मुलाने पाईप पकडून वाचवला जीव, हत्येच्या तपासासाठी आठ पथके तैनात

जळगाव (प्रतिनिधी) : कामाच्या शोधात महाराष्ट्रातील जळगाव येथून गुजरातच्या सुरत जिल्ह्यात निघालेल्या पाटील कुटुंबाला बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ चार जणांनी अडवून कालव्याच्या खोल पाण्यात फेकले. या घटनेत कुटुंबातील आई-वडिलांसह तिघांचा मृत्यू झाला असून, १३ वर्षीय मुलगा बचावला आहे. कुटुंबातील अन्य दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेने जळगावसह परिसरात खळबळ उडाली आहे.
जळगाव येथे वास्तव्यास असलेले हे कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. नितीन ऊर्फ भुऱ्या पाटील हे एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कारखान्यात मजूर म्हणून काम करत होते. अधिक काम मिळविण्याच्या उद्देशाने ते २१ नोव्हेंबर रोजी कुटुंबीयांसह सुरतच्या दिशेने निघाले होते.
पाटील कुटुंबाचे वाहन सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ पोहोचले असता, दुसऱ्या कारमधून आलेल्या चार जणांनी त्यांच्या वाहनासमोर गाडी आडवी लावून त्यांना अडवले. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना जबरदस्तीने वाहनातून बाहेर काढून कालव्याच्या खोल पाण्यात फेकले. हा प्रकार केल्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले.
कालव्याच्या पाण्यात फेकल्यानंतर कुटुंबातील १३ वर्षीय मुलाने प्रसंगावधान राखत कालव्यातील एका पाईपला घट्ट पकडून ठेवले. त्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्यापासून बचावला. काही वेळानंतर कालव्यातून बाहेर पडून त्याने जवळच्या एका हॉटेलमध्ये धाव घेतली. तेथे त्याने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आणि घटनेची माहिती प्रशासनाला मिळाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि कालव्यात शोधमोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेदरम्यान महुवा तालुक्यातील डुंगरीजवळ कालव्याच्या पाण्यात तीन मृतदेह आढळले. मृतांमध्ये एक पुरुष, एक महिला आणि एका तरुणीचा समावेश आहे. नातेवाइकांनी मृतदेहांची ओळख पटवली असून, पुरुषाचे नाव नितीन ऊर्फ भुऱ्या पाटील आणि महिलेचे नाव कविता पाटील असल्याचे समोर आले आहे. कविता पाटील यांच्या पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या नितीन पाटील यांच्यासोबत राहत होत्या.
कुटुंबातील प्रथमेश पाटील आणि हरीश पाटील ही दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाकडून कालव्याच्या परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे. मुलांचा शोध लागेपर्यंत ही मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे.
या प्रकरणी बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात खंडियो, अभो, बंटी आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सूरत ग्रामीण पोलिसांनी हत्येच्या दिशेने तपास सुरू केला आहे. संपूर्ण कुटुंबाला लक्ष्य करण्यामागील कारण काय, संशयितांचा या कुटुंबाशी नेमका काय संबंध होता आणि हा प्रकार पूर्वनियोजित होता का, याचा तपास केला जात आहे.
संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आठ स्वतंत्र पथके तयार केली आहेत. बेपत्ता मुलांचा शोध घेणे, संशयितांचा ठावठिकाणा शोधणे आणि घटनेमागील कारण स्पष्ट करणे, या दृष्टीने तपास सुरू आहे.








