कर्जबाजारीपणा आणि पीक नुकसानीच्या विवंचनेतून विदगावातील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव, प्रतिनिधी :

एकीकडे डोक्यावर असलेली कर्जफेडीची चिंता आणि दुसरीकडे दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पिकांचे झालेले मोठे नुकसान, या दुहेरी आर्थिक विवंचनेतून विदगाव (ता. जळगाव) येथील दिव्यांग शेतकरी गजानन पद्माकर पाटील (वय ४८) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. २१ नोव्हेंबर रोजी रात्री ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यांग असतानाही गजानन पाटील हे अत्यंत जिद्दीने शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. शेतीच्या कामासाठी त्यांनी कर्ज घेतले होते. मात्र, यंदा निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी, घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून ते तीव्र मानसिक तणावाखाली व आर्थिक अडचणींचा सामना करत होते.
याच नैराश्यातून त्यांनी २१ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे विदगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.








