जळगाव, प्रतिनिधी : येथील ठाकूर समाज कार्यालयात आदिवासी जननायक, महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक, महिला वर्ग, युवक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शिक्षण, सामाजिक ऐक्य आणि हक्कांच्या लढ्यासाठी एकत्र येण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते भाऊसाहेब पंढरीनाथ ठाकूर यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला. ‘जल, जंगल आणि जमीन’ या हक्कांसाठी त्यांनी पारंपरिक शस्त्रांच्या बळावर इंग्रज सत्तेला दिलेले आव्हान अत्यंत प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समाजापुढील विविध समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन परस्परांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात एरंडोल नगरीचे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी, समाजावर होत असलेल्या अन्यायकारक घटनांना न जुमानता अन्यायाविरोधात संघटितपणे आवाज उठवून न्याय मिळविण्याचे आवाहन केले. सरिता दौलत ठाकूर यांनी आपल्या मनोगतातून महिलांच्या सर्वांगीण विकासावर भर देत महिला वर्गाला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे आवाहन केले.
रुपेश ठाकूर यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले, तर गोपाल ठाकूर, निलेश ठाकूर व सागर ठाकूर यांनी विशेष सहकार्य केले. या सोहळ्यात डॉ. नरेंद्र ठाकूर, सुदाम सौंदाणे, संजय बन्सी ठाकूर, गणेश अहिरे, प्रभाकर मोरे, सूर्यभान ठाकूर, संजय साळुंखे, सुभाष चव्हाण, डॉ. दीपक ठाकूर, अनिल ठाकूर, पुरुषोत्तम सोनवणे, समाधान चव्हाण, विजय ठाकूर, रवींद्र सोनवणे, गोपाल अहिरे, हितेश ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते.








