जळगाव, प्रतिनिधी : शहरातील गिरणा पंपिंग रोड परिसरातील शाम नगरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन बंद घरांना लक्ष्य करत चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. कटरच्या सहाय्याने दरवाजांचे कुलूप आणि कडीकोयंडे तोडून घरात प्रवेश करत चोरट्यांनी रोकड आणि मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला. रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास हा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे, चोरीच्या घटनेतील तीन संशयित चोरटे एका घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

शहरातील शाम नगर परिसरात एकाच रांगेत असलेली तीन घरे चोरट्यांनी हेरली होती. रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास डोक्यावर टोपी, चेहऱ्यावर मास्क आणि हातात हातमोजे घातलेले तीन जण परिसरात दाखल झाले. त्यांनी कटरच्या सहाय्याने घरांचे कुलूप आणि कडीकोयंडे तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील साहित्याची उचकापाचक करत कपाटांचे लॉकर उघडले आणि त्यातील ऐवज घेऊन पसार झाले.

तीन घरांपैकी एका घराचे मालक रविवारी सायंकाळी घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांच्या घरातून सुमारे दहा हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उर्वरित दोन घरांचे मालक बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरातून नेमका किती ऐवज चोरीला गेला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे दोन्ही घरमालक सोमवारी परतल्यानंतर चोरीचा नेमका तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
चोरीच्या वेळी चोरटे बॅटरीच्या प्रकाशात घराचे कुलूप तोडताना दिसत आहेत. त्यापैकी एक जण घराच्या दरवाजाजवळ थांबून बाहेरच्या हालचालींवर लक्ष ठेवत असल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. संबंधित घराबाहेर लावलेल्या कॅमेऱ्यात तिघांच्या हालचाली कैद झाल्या असून पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले आहे.
चोरी झालेल्या घरांच्या शेजारीच एक सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक राहतात. पहाटेच्या सुमारास घराबाहेर आवाज झाल्याने त्यांना जाग आली. त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेत शिट्टी वाजवली. शिट्टीचा आवाज ऐकताच चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने गुन्हा दाखल झालेला नव्हता. बाहेरगावी असलेले घरमालक परतल्यानंतर चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा नेमका तपशील स्पष्ट होणार आहे.








