जळगाव, प्रतिनिधी : अनैतिक संबंधाच्या संशयावरून झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने कारवाई करत जेरबंद केले आहे. शिरसोली येथे ९ नोव्हेंबर २०२६ रोजी फिर्यादीचे चुलतभाऊ गोरख विठ्ठल ठाकूर (वय ५५, रा. कारके वस्ती, लोणावळा, पुणे, ह.मु. शिरसोली) हे आलेले असताना, त्यांचा मुकुंदा प्रल्हाद पाटील (वय ४२, रा. शिरसोली) याच्यासोबत वाद झाला. या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या गोरख ठाकूर यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनखाली गुन्हे शोध पथकाने तात्काळ सूत्रे हलवली. आरोपी मोबाईल वापरत नसला तरी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शिरसोली गावात लपून बसलेल्या मुकुंदा प्रल्हाद पाटील याला जेरबंद केले.

चौकशीदरम्यान त्याने अनैतिक संबंधाच्या संशयावरून लाकडी डांडका व फावड्याच्या साहाय्याने डोक्यात वार करून खून केल्याची कबुली दिली असून, एमआयडीसी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ही धडाकेबाज कामगिरी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड.पो.उप.निरी विजयसिंग पाटील आणि पोलीस पथकातील अंमलदारांनी पार पाडली आहे.








