जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरात कौटुंबिक वादातून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि. २६ ऑक्टोबर) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात सनी विनोद डोळे (वय २१, रा. शिवाजीनगर, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याची आजी सुमनबाई तायडे जखमी झाल्या आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपी आणि सनीचा मेहुणा सुरज नारायण वानखेडे (रा. कंडारी, ता. भुसावळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सनी डोळे आणि त्याच्या बहिणीचा पती सुरज नारायण वानखेडे यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसक घटनेत झाले. संशयित सुरज याने सनीवर धारदार शस्त्राने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

या घटनेत सनीची आजी सुमनबाई तायडे यांच्या हातालाही दुखापत झाली आहे. नातवाच्या मृत्यूची बातमी समजताच त्याची आई आणि आजी यांनी रुग्णालयात केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता. अवघ्या २१व्या वर्षी सनीचा मृत्यू झाल्याने शिवाजीनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपी सुरज वानखेडे याला ताब्यात घेतले. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.








