प्रतिनिधी : जळगाव शहरानजीक पाळधी बायपासवरील रेल्वे पुलावर सिमेंट काँक्रीटचे जॉइंट स्लॅब काढत असताना घडलेल्या दुर्घटनेत क्रेन चालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी दुसरा क्रेन ऑपरेटर आणि ठेकेदाराविरोधात धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुलाचा स्लॅब कापून काढताना क्रेन कोसळून चालक मधुकर धनराज पाटील (वय ४३, रा. खपाट, ता. धरणगाव) यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. याबाबत त्यांचे चुलत भाऊ डॉ. दीपक वामन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मृत मधुकर पाटील हे क्रेनच्या साहाय्याने रेल्वे पुलाचे जॉइंट स्लॅब काढत होते. जेसीबी ऑपरेटर बन्समनी जानकी प्रसाद प्रजापती (रा. मध्य प्रदेश) याने निष्काळजीपणा व

हयगय करत स्लॅब खालून दिलेला सपोर्ट अचानक काढून घेतला. त्यामुळे वरच्या क्रेनची लोखंडी रोप वायर तुटून क्रेनसह मधुकर पाटील पुलावरून खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. ठेकेदार हरिओम लक्ष्मीनारायण ओझा (रा. इंदूर) यांनी सुरक्षेची कोणतीही साधने किंवा पुलाखाली सुरक्षा जाळी उपलब्ध करून न देता धोकादायक काम करण्यास लावल्याने अपघात घडला. या प्रकरणी ऑपरेटर बन्समनी प्रजापती व ठेकेदार हरिओम ओझा यांच्याविरोधात भारतीय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पाळधी आऊट पोस्टचे सहायक पोलिस निरीक्षक भूषण कोते यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल जितेश नाईक हे या घटनेच्या संदर्भात पुढील तपास करत आहे.









