जळगाव, प्रतिनिधी : जेवण बनवून न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मुलाने स्वतःच्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना बोदवड तालुक्यातील येवती येथे उघडकीस आली आहे. अलकाबाई पुरुषोत्तम वाघ (वय अंदाजे ६३) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांचा मुलगा गणेश पुरुषोत्तम वाघ याच्याविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार, २५ ऑक्टोबर रोजी पहाटे ही घटना समोर आल्याने गावात खळबळ उडाली आहे.

अलकाबाई वाघ या येवती येथे मुलगा गणेश याच्यासोबत राहत होत्या. त्यांचे पती पुरुषोत्तम वाघ यांचे सुमारे १५ वर्षांपूर्वी निधन झाले होते. या प्रकरणातील फिर्यादी आकाश रविंद्र महाजन (वय २४) हे अलकाबाई यांचे नातू असून, ते जामनेर तालुक्यातील पाटखेडा येथे मेव्हण्याकडे राहून मजुरी करतात.

२५ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ५.०५ वाजता आकाश यांचा भाऊ अनिकेत याने फोन करून आजीची हत्या झाल्याची माहिती दिली. त्यानंतर आकाश महाजन हे मेव्हणे धर्मराज शशिकांत पाटील यांच्यासोबत तातडीने येवती येथे रवाना झाले.
पहाटे सुमारे ५.३० वाजता ते अलकाबाई यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी घरासमोर नागरिकांची गर्दी जमली होती. घरात जाऊन पाहिले असता अलकाबाई रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेल्या दिसल्या. त्यांच्या अंगावर गोधडी टाकलेली होती. जवळच गणेश वाघ हातात खुरपे घेऊन बसलेला दिसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनास्थळी रक्ताचे डाग असलेली फुटलेली लोणच्याची बरणी आणि शेतीकामासाठी वापरण्यात येणारे लोखंडी अवजार पडलेले असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
फिर्यादी आकाश महाजन यांनी गणेश वाघ याला घटनेबाबत विचारणा केली असता, जेवण बनवून न दिल्याच्या रागातून आईच्या डोक्यात लोणच्याची बरणी मारली आणि त्यानंतर खुरप्याने वार केल्याचे त्याने सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर आकाश महाजन यांनी बोदवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गणेश पुरुषोत्तम वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृद्ध आईच्या मृत्यूच्या या घटनेने येवती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नेमकी पार्श्वभूमी आणि संबंधित बाबींचा उलगडा पोलीस तपासातून होणार आहे.









