यावल, प्रतिनिधी : तालुक्यातील किनगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) पथसंचलनाला विरोध झाल्याने रविवारी काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. पथसंचलनादरम्यान तुरळक दगडफेक झाल्याची माहिती समोर आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आहे.

दसऱ्याच्या निमित्ताने किनगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी गावातून पथसंचलन सुरू असताना एका गटाकडून विरोध करण्यात आल्याचे सांगण्यात येते. एका धार्मिक स्थळासमोरून पथसंचलन जात असताना काही महिलांनी ठिय्या मांडून विरोध दर्शविल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.

पथसंचलनादरम्यान तुरळक दगडफेक झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला. या वेळी रस्त्यावर नागरिकांची गर्दी झाली आणि काही काळ धावाधाव व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने अतिरिक्त कुमक मागवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्यासह भुसावळ, यावल आणि रावेर येथील पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले. जमाव पांगल्यानंतर पोलीस बंदोबस्तात पथसंचलन पार पडल्याची माहिती आहे.
घटनेनंतर किनगाव परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सोशल मीडियावर अप्रमाणित संदेश प्रसारित करू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. परिसरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे.








