एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

जिल्ह्यात एस थ्री मॉडेल मतदान यंत्र ईव्हीएम प्रात्यक्षिक प्रशिक्षण व सॉफ्टवेअर प्रशिक्षण

जळगाव, प्रतिनिधी निवडणुकांमध्ये १५ ते २० वर्षे जुन्या एम-२ ईव्हीएमचा वापर करण्यात आला होता. आगामी निवडणूक मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित करण्यासाठी अत्याधुनिक एस-३ नवीन ईव्हीएम मॉडेलचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ६० हजार कंट्रोल युनिट आणि १ लाख २० हजार बॅलेट युनिट नव्याने खरेदी करण्यात आले आहेत, अशी माहिती मा.राज्य निवडणूक आयुक्त श्री.दिनेश वाघमारे यांनी दिली.

हैदराबाद येथील मे.ईसीआयएल कंपनीकडून एस-३ ईव्हीएमच्या संदर्भात तसेच ईव्हीएम मॅनेजमेंट सिस्टीम (ईएमएस) सॉफ्टवेअरबाबत जिल्ह्यातील निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन सभागृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मा.श्री.वाघमारे बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, राज्य निवडणूक आयोगाचे विशेष कार्यकारी अधिकारी अतुल जाधव, उपजिल्हाधिकारी विजय कुमार ढगे, राज्य निवडणूक आयोगाचे सहाय्यक कक्षाधिकारी पुराणशिंग राठोड, संतोष चव्हाण, राम कराडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार तसेच निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री.वाघमारे म्हणाले की, एस-३ ईव्हीएममध्ये मल्टि-पोस्ट व मल्टि-व्होटिंगची सुविधा असून भविष्यातील कायदेशीर बदलांनुसार आवश्यक बाबी हाताळण्याची क्षमता या यंत्रांमध्ये आहे. राज्य निवडणूक आयुक्तांसह आयआयटी मुंबई, आयआयएससी बेंगळुरू यांसह नामवंत तांत्रिक संस्थांचा समावेश असलेल्या टेक्निकल इव्हॅल्युएशन कमिटीने या नवीन एस-३ मॉडेलची रचना केली आहे. या यंत्रांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण राज्यभर देण्यात येत आहे.
एस-३ ईव्हीएममध्ये ओएलईडी डिस्प्ले, अधिक माहिती प्रदर्शित करण्याची क्षमता, सिक्युअर मेमरी मॉड्यूल, युनिक सिरियल नंबर आणि क्यूआर कोड यांसारखी आधुनिक सुरक्षा, वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. एका कंट्रोल युनिटला १६ बॅलेट युनिट जोडता येत असल्याने अधिकाधिक उमेदवारांचा समावेश करणे सुलभ होणार आहे. अंक, अल्फाबेट व हायफन यांचा वापर करून वॉर्ड क्रमांक व बूथ क्रमांक अचूकपणे नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. या नवीन एस ३ मॉडेलच्या एका ईव्हीएम मतदान यंत्रामध्ये १० हजार मतदान व २ हजार मतदारांची मतदान करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मागील नगरपालिका व महानगरपालिका निवडणूक यशस्वीपणे हाताळल्याबद्दल जिल्हाधिकारी रोहन घुगे व त्यांच्या टीमचे श्री. वाघमारे यांनी अभिनंदन केले. आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम यंत्रांच्या साठवणुकीसह आवश्यक नियोजन चोख ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यावेळी म्हणाले, आगामी ग्रामपंचायत आणि विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) वापराबाबत कर्मचाऱ्यांनी योग्य प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये चुरस अधिक असल्याने मशीनमधील तांत्रिक अडचण हाताळणे आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळे निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही प्रशिक्षण सत्रे गांभीर्याने घ्यावीत,असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.
प्रशिक्षणादरम्यान हैदराबाद येथील ईसीआयएल कंपनीचे तांत्रिक व्यवस्थापक तथा प्रशिक्षक शैलेंद्रकुमार सिंह यांनी एम-२ आणि प्रस्तावित एस-३ ईव्हीएममधील वैशिष्ट्ये, सुधारणा व उपलब्ध अद्यावत प्रणालीबाबत पीपीटी आणि प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर माहिती दिली. ईव्हीएम हाताळताना उद्भवणाऱ्या संभाव्य समस्या तसेच त्यावरील उपाययोजनांचीही त्यांनी माहिती दिली.









