जळगाव | प्रतिनिधी : ग.स. सोसायटी अर्थात सरकारी नोकरांची सहकारी संस्थेने सभासदांसाठी कर्जमर्यादेत पाच लाख रुपयांची वाढ प्रस्तावित केली आहे. त्यानुसार सर्वसाधारण सभासदांसाठी कर्जमर्यादा १५ लाखांवरून २० लाख रुपये, तर वर्ग चार कर्मचाऱ्यांसाठी ७ लाख ५० हजारांवरून १२ लाख रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच सभासदांना यंदा १० टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती गसच्या अध्यक्षा रागिणी चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गसची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, १३ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता नूतन मराठा महाविद्यालयात होणार आहे. सभेच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी संचालकांनी पत्रकार परिषद घेऊन संस्थेच्या कामकाजाची आणि आगामी निर्णयांची माहिती दिली. यावेळी अध्यक्षा रागिणी चव्हाण बोलत होत्या.

मयत सभासदांच्या कर्जाबाबत माहिती देताना चव्हाण यांनी सांगितले की, गसने मयत सभासदांचे विविध प्रकारचे कर्ज माफ केले आहे. यामध्ये जामीनकी कर्जाचे २ कोटी ३९ लाख रुपये, तर अन्य प्रकारचे ३ कोटी ७४ लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. तसेच कर्ज न घेतलेल्या मात्र मयत झालेल्या सभासदांच्या कुटुंबीयांना १ कोटी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सभासदांना बैठकीसाठी देण्यात येणारा भत्ता यंदा एक हजार रुपये करण्यात येणार आहे. नव्या सभासदांची प्रवेश फी आठ हजार रुपयांवरून चार हजार रुपये करण्याचा निर्णय प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच ज्येष्ठ सभासद योजनेअंतर्गत सभासदत्वाला २५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांना प्रत्येकी ५ हजार १ रुपये, तर ३० वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांना प्रत्येकी ७ हजार १ रुपयांची भेट देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गसच्या भरती प्रक्रियेवर विरोधकांकडून आक्षेप घेण्यात येत असला तरी संस्थेचा आकृतीबंध कमी करण्यात आल्याचे अहकार गटाचे अध्यक्ष उदय पाटील यांनी स्पष्ट केले. संस्थेतील कर्मचाऱ्यांची संख्या ३४५ वरून ३१० करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात सभासदांसाठी अपघात विमा काढण्यात येणार असून, संस्थेची सभासद संख्या वाढविण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची माहितीही अध्यक्षा रागिणी चव्हाण यांनी दिली.
गस सोसायटीमध्ये गेल्या चार वर्षांपासून सर्व संचालक एकाच व्यासपीठावर होते. मात्र, यंदाच्या सभेला रावसाहेब पाटील, अमरसिंग पवार, रविंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे आणि प्रतिभा सुर्वे हे उपस्थित नसल्याबाबत विचारले असता रागिणी चव्हाण यांनी विरोधकांवर टीका केली. चार वर्षे हे संचालक आमच्यासोबत होते आणि अनेक निर्णयांमध्ये सहभागी झाले. मात्र, महिला अध्यक्षा झाल्यानंतर त्यांना विरोधक होण्याचा साक्षात्कार झाला, असा टोला त्यांनी लगावला.
पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते व्ही. झेड. पाटील, उपाध्यक्ष अनिल गायकवाड, अहकार गटाचे अध्यक्ष उदय पाटील, गटनेते अजबसिंग पाटील, मनोज पाटील, सुनील सूर्यवंशी, महेश पाटील, योगेश इंगळे, विजय पवार यांच्यासह संचालक उपस्थित होते.








