जळगाव प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ‘एक खिडकी योजने’तून ५८ सार्वजनिक गणेश मंडळांना परवानग्या वितरीत करण्यात आल्या आहेत.

पोलीस मुख्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या या सुटसुटीत आणि मध्यवर्ती सुविधेमुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांची धावपळ थांबली आहे. सोमवारी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या केंद्राला भेट देऊन तेथील एकूण प्रक्रियेची पाहणी केली.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणी, विद्युत जोडणी आणि मिरवणुकीच्या परवानग्यांसाठी विविध कार्यालयांचे फेरे मारावे लागू नयेत, म्हणून एकाच छताखाली ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे

. या केंद्रावर मंडळांकडून निवेदन, प्रतिज्ञापत्र स्वीकारले जात असून आवश्यक ती कागदपत्रे तपासून मंजुरी दिली जात आहे. अर्ज प्रक्रियेदरम्यान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक, ओळखपत्राची माहिती आणि मंडप उभारणीच्या जागेचा नकाशा याची तपासणी केली जात आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कामकाजाचा आढावा घेत सर्व प्रक्रिया पारदर्शक आणि जलद गतीने राबवण्याचे आदेश उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.









