जळगाव, प्रतिनिधी : राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी (डीयूपीसीओपी) येथे विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये क्रिकेट आणि बॅडमिंटनचा समावेश असून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित स्पर्धांना उत्तम प्रतिसाद दिला.

क्रिकेट स्पर्धेत विद्यार्थ्यांचे एकूण तीन संघ सहभागी झाले. यामध्ये डीयूपीसीओपी लायन्स, डीयूपीसीओपी टायटन्स आणि डीयूपीसीओपी रेंजर्स या संघांचा समावेश होता. अटीतटीच्या आणि रंगतदार झालेल्या सामन्यांमध्ये डीयूसीपीओपी रेंजर्स संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. डीयूसीपीओपी टायटन्स संघाने उपविजेतेपद मिळविले.

तसेच, बॅडमिंटन स्पर्धेलाही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अंतिम सामन्यात ट्विंकल माळी आणि भारती शेजूळ यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद आपल्या नावे केले.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित या क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, संघभावना, नेतृत्वगुण, शिस्त आणि निरोगी जीवनशैली यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत स्पर्धांचा आनंद लुटला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासासोबतच शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि सांघिक सहभागाचे महत्त्व अनुभवता आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल गिरी, डॉ. अमित जयस्वाल, डॉ. अनुराग मेहता, डॉ. आशिषकुमार पाटील तसेच महाविद्यालयातील इतर शिक्षक कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मोलाचे सहकार्य केले.








