जामनेर, प्रतिनिधी : बापाच्या नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील मोहाडी येथे उघडकीस आली आहे. स्वतःच्याच १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील रहिवासी पीडित १२ वर्षांची चिमुकली ही २१ ऑगस्ट रोजी रात्री घरात झोपलेली असताना, तिचा पिता याने तिच्या असहायतेचा फायदा घेतला. मुलीने तीव्र विरोध केला असता, नराधम बापाने काहीही न ऐकता तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात रविवारी (दि.२३) पहाटे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून जामनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) स्वप्नील शिंदे यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवली. रविवारी (दि.२३) दुपारी १२ वाजेच्या सुमारास आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.









