विशेष प्रतिनिधी जळगाव : शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्र्यंबक नगर परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने आणि १ लाख २५ हजार रुपयांची रोकड असा एकूण ३ लाख ४७ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश गजानन साखरे (वय ६४, रा. ३३, त्र्यंबक नगर, जळगाव, व्यवसाय-भिक्षुकी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

घर बंद असल्याचा साधला फायदा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश साखरे हे १६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दरम्यान, १६ ते २१ ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेले २ लाख २२ हजार १५० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि १ लाख २५ हजार रुपयांची रोकड (१०, ५०, १००, २०० व ५०० रुपयांच्या नोटा) असा एकूण ३ लाख ४७ हजार १५० रुपयांचा ऐवज चोरून नेला. २१ ऑगस्ट रोजी प्रकाश साखरे घरी परतल्यानंतर घरफोडीचा हा प्रकार निदर्शनास आला.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(a), ३३१(३) व ३३१(४) अन्वये घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार जिंतेंद्र राठोड करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संशयितांचा माग काढला जात आहे.









