वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात किराणा दुकानासमोर वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद होऊन दगडफेक झाल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

किरकोळ वादाचे दगडफेकीत रूपांतर
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुप्रीम कॉलनीतील एका किराणा दुकानासमोर वाळू टाकण्यात आली होती. यावरून दुकान मालकाच्या मुलाचा एका व्यक्तीसोबत वाद झाला. त्यानंतर काही तरुण एकत्र येत समोरील गल्लीत दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्युत्तरादाखल दुसऱ्या गटातील काही व्यक्तींनीही दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचे पथक तसेच एसडीपीओंचे आरसीपी पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून जमाव पांगवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तसेच अन्य उपलब्ध माहितीची पडताळणी सुरू आहे. दगडफेकीत नेमका कोणाचा सहभाग होता, याचा तपास करण्यात येत असून, दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सध्या सुप्रीम कॉलनी परिसरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून शांतता आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच परिसरातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले.









