मन्यारखेडा तलाव प्रदूषण प्रकरण : १६ उद्योजकांना कारणे दाखवा नोटीस; त्रासाला कंटाळून तीन उद्योग पडले बंद

जळगाव, (प्रतिनिधी) : मन्यारखेडा येथील तलावातील मासे मृत्यूप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व नियमांचे पालन करूनही स्थानिक १६ उद्योजकांना प्रशासनाकडून जाणूनबुजून वेठीस धरले जात असल्याचा गंभीर आरोप उद्योजकांनी केला आहे. या सततच्या त्रासामुळे परिसरातील तीन उद्योग बंद पडल्याची खळबळजनक माहितीही त्यांनी दिली. मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत उद्योजकांनी आपली व्यथा मांडली.

मन्यारखेडा तलावात मोठ्या प्रमाणावर मासे दगावल्याची घटना घडल्यानंतर, स्थानिक मत्स्य उत्पादकाने केलेल्या तक्रारीच्या आधारे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी (SDM) १६ उद्योजकांना सुनावणीची नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे उद्योजकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. आपण नियमानुसार उद्योग चालवत असतानाही आपल्याला विनाकारण लक्ष्य केले जात असून प्रशासकीय जाचाला कंटाळून तीन उद्योजकांनी आपले उद्योग बंद केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच मासे दगावल्याचे मूळ कारणाचा देखील शोध घेण्याची मागणी करण्यात आली.

पत्रकार परिषदेस रवींद्र फालक, मधुकर महाजन, संतोष इंगळे यांच्यासह दत्तू मराठे, रमेश सोनार, कैलास पाटील, सतीलाल पाटील, संदीप वाघ, चंद्रकांत कोल्हे आणि संतोष कोळी आदी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “प्रशासनाने उद्योजकांना विनाकारण वेठीस धरणे थांबवावे,” अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली.








