जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी ५७७ मतांचा विक्रमी टप्पा गाठत दणदणीत विजय संपादन केला आहे. जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी दाखविलेली अभूतपूर्व एकजूट, प्रभावी संघटनशक्ती आणि लोकप्रतिनिधींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा विजय ऐतिहासिक ठरला असून, जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात यामुळे नवा अध्याय लिहिला गेला आहे.
या निवडणुकीत राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांनी संपूर्ण प्रक्रियेचे थेट नेतृत्व केले. त्यांनी महायुतीच्या सर्व घटक पक्षांना एकत्र ठेवत समन्वयाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याच बरोबर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, मंत्री ना. संजय सावकारे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खा. स्मिता वाघ, आ. राजूमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. अमोल जावळे, आ.किशोर पाटील, आ. चंद्रकांत सोनवणे आणि आ. चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकदिलाने काम करत विजयासाठी भक्कम वातावरण निर्माण केले.
निवडणुकीच्या या रणधुमाळीत जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज पाटील, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, भाजप शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, भाजप पूर्व जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, शिवसेना शहराध्यक्ष विष्णू भंगाळे यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे जिल्हा, तालुका, शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी, नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी परिश्रम घेतले. संपूर्ण निवडणूक कालावधीत झालेल्या नियोजनबद्ध बैठका, समन्वय मेळावे आणि मतदार संपर्क अभियानामुळे महायुतीची ताकद तळागाळापर्यंत पोहोचली.
हा निकाल म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुमित्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेल्या विकासाभिमुख शासनव्यवस्थेवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेला थेट विश्वास मानला जात आहे. राज्य शासनाच्या विविध विकासकामांना आणि लोककल्याणकारी योजनांना मिळालेल्या भक्कम पाठिंब्याचे प्रतिबिंबच या निकालातून समोर आले आहे.
नंदकिशोर महाजन यांना मिळालेली विक्रमी ५७७ मते ही केवळ विजयाची आकडेवारी नसून, महायुतीच्या नेतृत्वावर आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांवर मतदारांनी टाकलेली जनविश्वासाची पावती असल्याचे बोलले जात आहे. या घवघवीत विजयामुळे आगामी काळातही जळगाव जिल्ह्यात विकास आणि जनसेवेची वाटचाल अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला.







