जळगाव, (प्रतिनिधी) : चाकूचा धाक दाखवून आणि बेदम मारहाण करून दुचाकीस्वारांना लुटणाऱ्या ४ अट्टल गुन्हेगारांना जळगाव तालुका पोलिसांनी अत्यंत वेगाने कारवाई करत अवघ्या दोन तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये जळगाव शहरातील दोन सराईत व हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ११ जून रोजी रात्री ०१:३० ते ०३:१५ वाजेच्या सुमारास फिर्यादी चेतन प्रकाश पाटील (वय ३०, रा. खोटे नगर, जळगाव) हे त्यांच्या साथीदारांसह मोटरसायकलने जळगाव ते पाळधी रोडवरून जात होते.
दरम्यान, हॉटेल साई गार्डन आणि हॉटेल राधिका जवळ सार्वजनिक रस्त्यावर चार आरोपींनी त्यांची मोटरसायकल अडवली. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना चाकूचा धाक दाखवून, चापटबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व शिवीगाळ करत दमदाटी केली. एवढेच नव्हे तर, आरोपींनी त्यांच्या खिशातील एकूण ७,८०० रुपये रोख रक्कम जबरीने हिसकावून घेतली आणि फिर्यादींच्या मोटरसायकलची तोडफोड करून घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या २ तासांत आरोपी जेरबंद..
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शोध पथक त्वरित रवाना केले. पथकाने अत्यंत कल्पकतेने व गुप्त माहितीच्या आधारे शोध घेत अवघ्या २ तासांच्या आत ४ ही आरोपींना जेरबंद केले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे व पार्श्वभूमी..
१. चेतन उर्फ बटाटा रमेश सुशीर (वय २१, रा. संत मिराबाई नगर, जळगाव) – हा पोलीस अभिलेखावरील अट्टल गुन्हेगार असून हिस्ट्रीशीटर आहे. त्याच्यावर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
२. उमाकांत दत्तात्रेय जाधव (रा. संत मिराबाई नगर, जळगाव) – हा देखील सराईत गुन्हेगार असून त्याला जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तडीपार/हद्दपार करण्यात आलेले आहे. त्याच्यावर जिल्हापेठ, जळगाव शहर आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
३. गौरव संजय जाधव (वय २१, रा. साई नगर, जळगाव)
४. रोशन भगवान पाटील (वय २६, रा. पांडुरंग नगर, जळगाव)
पोलीस पथकाची कामगिरी..
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे सफौ. सुनिल पाटील, पोलीस हवालदार योगेश पाटील, पोलीस हवालदार अविनाश देवरे, कैलास इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण कोळी, दीपक देवरे, किरण पाटील आणि वाहन चालक पोहेकॉ पंकज देशमुख यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे हे करीत आहेत.







