जळगाव ,प्रतिनिधी : भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत एकूण १० गुन्हे दाखल करण्यात आले असून, २६५ लिटर गावठी दारू आणि २ हजार ८०० लिटर रसायनासह एकूण १ लाख ६६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती संकलित करून प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाईसाठी मार्गदर्शन केले.

दिपनगर, कु-हा, साकेगाव आणि किन्ही परिसरात कारवाई ; या विशेष मोहिमेंतर्गत दिपनगर दुरक्षेत्र, कु-हा दुरक्षेत्र, साकेगाव बीट आणि किन्ही परिसरात छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण १० स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.दिपनगर दुरक्षेत्रात पिंप्रीसेकम येथील अशोक धनसिंग तायडे (वय ५१) आणि फेकरी येथील वाल्मीकनगरातील रितेश प्रकाश सूर्यवंशी (वय २८) यांच्याविरुद्ध प्रत्येकी २० लिटर गावठी दारूसंदर्भात कारवाई करण्यात आली. या दोन्ही प्रकरणांत प्रत्येकी २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कु-हा दुरक्षेत्रात बेलव्हाय येथील निवृत्ती दगडू सोनवणे (वय ४५) याच्याकडून ३० लिटर, तर वराडसीम येथील विलास गोविंदा सपकाळे (वय ५८) याच्याकडून १५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणांत अनुक्रमे ३ हजार आणि १ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
साकेगावात तिघांवर कारवाई ;साकेगाव बीटमध्ये सागर मधुकर सोनवणे (वय ३०), भगवान भीमराव कोळी (वय ३८) आणि केशव माधव मराठे (वय ५०, सर्व रा. साकेगाव, ता. भुसावळ) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. या तिन्ही प्रकरणांत प्रत्येकी ३० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. प्रत्येक प्रकरणातील मुद्देमालाची किंमत ३ हजार रुपये आहे.
किन्ही परिसरात मोठ्या प्रमाणात रसायन जप्त किन्ही परिसरातील कारवाईत कन्हाळा येथील उस्मान हसन गवळी (वय ४९), खलील हसन गवळी (वय ३९) आणि युनुस हसन गवळी (वय ४३) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत अनुक्रमे ८००, १ हजार ६०० आणि ४०० लिटर रसायन जप्त करण्यात आले. या तिन्ही प्रकरणांत अनुक्रमे ४३ हजार, ८३ हजार आणि २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन : जिल्ह्यात कुठेही अवैध दारू निर्मिती, विक्री किंवा वाहतूक सुरू असल्याची माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलिसांना कळवावी. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत वाल्मिक सोनवणे, सुभान तडवी, विकास बाविस्कर, सुधीर विसपुते, ईस्तीयाक शेख, हेमंत मिटकर, रशीद तडवी, सुभाष सोनवणे, सचिन पारधी, न्यायाजोद्दीन तडवी, किरण तायडे, जगदीश भोई आणि लीना लोखंडे यांचा सहभाग होता.








