जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील विमानतळ परिसरातील तारा बिझनेस पार्क भागात झालेल्या मोठ्या घरफोडीचा छडा लावण्यात जळगावच्या एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी मध्यप्रदेशातील सेंधवा येथील एका आंतरराज्य टोळीला अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल ११ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

तारा बिझनेस पार्क भागातील रहिवासी आणि रुबी कंपनीचे मालक मोईज अब्बाज बोहरा हे १३ एप्रिल रोजी आपल्या परिवारासह बाहेरगावी गेले होते. १६ एप्रिलच्या पहाटे जेव्हा ते घरी परतले, तेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले होते. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयित आरोपी मध्यप्रदेशातील सेंधवा तालुक्यातील दुर्गम भागात असल्याची माहिती मिळाली.
पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके आणि त्यांच्या पथकाने मध्यप्रदेशातील चाचरीया पाटी, सेंधवा परिसरात जाऊन वेशांतर केले आणि अत्यंत कौशल्याने सहा संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली.
यात १) निलेश उर्फ भुन्या माहेरिया डुडवे, २) ताराचंद पठाण सोलंकी, ३) सायसिंग राकेश सोलंकी, ४) रविंद्र छोटू आर्य, ५) दिलीप मंगा डुडवे, ६) ग्यारशीलाल मगन अलावे (सर्व राहणार: चाचरीया पाटी, ता. सेंधवा, जि. बडवानी, मध्यप्रदेश) यांना अटक केली आहे. दरम्यान त्यांच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ११,५०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेकों प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गिरीश ठाकुर, मोतीलाल बोरसे, विशाल कोळी, रमाकांत साळुंखे, शशिकांत मराठे, नितीन ठाकुर, राहूल घेटे या पथकाने उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.








