जळगाव, (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील ताडे येथे एका हळदी समारंभाच्या कार्यक्रमात कमरेला गावठी कट्टा (अग्निशस्त्र) लावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला कासोदा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ मे २०२६ रोजी ताडे (ता. एरंडोल) येथे एका हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी बाहेरगावाहून अनेक पाहुणे आले होते. रात्री ११:३० वाजेच्या सुमारास बँडच्या तालावर नाचत असताना, लखन प्रकाश वाघ (रा. परधाडे, ता. पाचोरा) या तरुणाच्या कमरेला गावठी कट्टा लावलेला काही नागरिकांना दिसून आला. याबाबत उपस्थित लोकांनी विचारणा केली असता, गर्दीचा फायदा घेऊन लखन वाघ तिथून पसार झाला.
या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस स्टेशनचे पथक सक्रिय झाले. दरम्यान, ५ मे २०२६ रोजी पोलीस तपासात गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संशयित आरोपी लखन वाघ हा पुन्हा गुन्हे करण्याच्या उद्देशाने ताडे गावात गावठी कट्टा घेऊन फिरत आहे. सपोनि श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ भातखेडे चौफुली येथे सापळा रचला. पोलिसांनी लखन वाघ याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक गावठी कट्टा (पिस्तूल) आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी हे मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि श्रीकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोलीस कर्मचारी निलेश गायकवाड, योगेश पाटील आणि सोनू पाचुंदे यांच्या पथकाने केली आहे.







