जळगाव, (प्रतिनिधी) : “जळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर बनवणे हे आपले प्राथमिक ध्येय आहे. स्वच्छता कामात कुठल्याही प्रकारचा नियमभंग, कर्मचाऱ्यांची खोटी हजेरी किंवा कामातील हलगर्जीपणा यापुढे अजिबात खपवून घेतला जाणार नाही,” असा कडक इशारा उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला दिला आहे.
शुक्रवारी महापालिकेतील उपमहापौर दालनात आरोग्य विभागाची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. यावेळी उपमहापौरांनी सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक, युनिट प्रमुख आणि स्वच्छता निरीक्षक यांना कामात तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीत उपमहापौरांनी प्रामुख्याने कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर बोट ठेवले. “कामगारांची हजेरी आता मुकादमांनी न घेता स्वच्छता निरीक्षकांनी स्वतः घ्यावी. यामुळे बोगस हजेरीला चाप बसेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, जे कर्मचारी सतत गैरहजर राहतात किंवा कामात टाळाटाळ करतात, त्यांना अधिकाऱ्यांनी पाठीशी घालू नये, अशा कडक सूचनाही त्यांनी दिल्या.
शहरातील कचरा व्यवस्थापनाबाबत बोलताना उपमहापौर म्हणाले की, प्रत्येक भागात घंटागाडी नियमितपणे फिरली पाहिजे. रस्ते आणि गटारींची स्वच्छता केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्ष दिसली पाहिजे. मक्तेदारांकडून होणारी अनियमितता रोखण्यासाठी प्रशासनाने अधिक दक्ष राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“स्वच्छतेच्या कामात खोटी माहिती देणे किंवा कर्तव्यात कसूर करणे महागात पडेल. यापुढे अशा बाबी निदर्शनास आल्यास कडक कायदेशीर किंवा प्रशासकीय भूमिका घेतली जाईल,” असे सांगत उपमहापौरांनी अधिकाऱ्यांमध्ये शिस्त आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या बैठकीमुळे आता जळगाव शहरातील स्वच्छता मोहिमेला नवी गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.







