जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर निश्चित झाला असून, येत्या ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी यासंदर्भातील अधिकृत निर्देश दिले आहेत.
नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर आता सर्वांचे लक्ष या पदांच्या निवडीकडे लागले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदींनुसार ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची या बैठकीसाठी ‘पीठासीन अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याचे निर्देश दिले आहेत. सभेचे कामकाज पार पडल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल आणि इतिवृत्त महानगरपालिकेच्या नोंदवहीत नोंदवून तो प्रशासनाकडे सादर करावा लागणार आहे.
जळगावसह नाशिक, धुळे आणि अहिल्यानगर महानगरपालिकांची निवड देखील ६ फेब्रुवारीलाच होणार असून, मालेगावसाठी ७ फेब्रुवारीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. जळगावच्या राजकीय वर्तुळात आता या निवडीवरून हालचालींना वेग आला असून, नव्या महापौरांच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.







