जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता काबीज केल्यानंतर, भारतीय जनता पक्षाने आपल्या संघटनात्मक हालचालींना वेग दिला आहे. पक्षाच्या गटनेतापदी नगरसेवक प्रकाश बालानी यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली असून, नाशिक येथे विभागीय आयुक्तांकडे भाजपच्या या गटाची अधिकृत नोंदणीही पूर्ण झाली आहे.
गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब..
महापालिका निवडणुकीचे निकाल राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर गटनेता निवडीसाठी बुधवारी भाजपचे सर्व ४६ नगरसेवक नाशिकला रवाना झाले होते. तेथे मंत्री गिरीश महाजन, आ. सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत गटनेता म्हणून प्रकाश बालाणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बालाणी यांच्यासोबतच महापालिकेचा प्रदीर्घ अनुभव असलेले नगरसेवक नितीन बरडे यांची उपगटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रतोदपदी डॉ. चंद्रशेखर पाटील यांची वर्णी..
पक्षाने या निवडीत ‘धक्कातंत्राचा’ वापर करत प्रभाग ९ मधील तरुण नगरसेवक डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्याकडे प्रतोद (Whip) पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. दुसऱ्यांदा निवडून आलेल्या एका युवा चेहऱ्याला संधी देऊन पक्षाने भविष्यातील नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली आहे.
आता प्रतीक्षा महापौर आरक्षणाची..
भाजपने आपली अंतर्गत पदे निश्चित केली असली तरी, सर्वांचे लक्ष आता मंत्रालयातील सोडतीकडे लागले आहे. गुरुवारी मंत्रालयात महापौर पदाचे आरक्षण जाहीर होणार असून, त्यानंतरच जळगावच्या प्रथम नागरिकपदासाठी कोणाची वर्णी लागणार, याचे चित्र स्पष्ट होईल.
माहिती कोपरा: ही पदे महत्त्वाची का?
गटनेता:
सभागृहात पक्षाची भूमिका मांडणारा मुख्य दुवा. पक्षाच्या धोरणांनुसार सदस्यांमध्ये समन्वय साधणे आणि महत्त्वाचे निर्णय घेणे ही गटनेत्याची जबाबदारी असते.
प्रतोद (Whip):
पक्षाची शिस्त राखणारा प्रमुख. महत्त्वाच्या मतदानावेळी सदस्यांना उपस्थित राहण्यासाठी आणि पक्षाच्या बाजूने मतदान करण्यासाठी ‘व्हीप’ बजावण्याचे अधिकार प्रतोदाकडे असतात.







