जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेबाबत आता नवा वाद निर्माण झाला आहे. मतमोजणीच्या वेळी असलेले सीसीटीव्ही फुटेज आणि फेरमतमोजणीसाठी किती उमेदवारांनी अर्ज केले होते, याबाबतची सविस्तर माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता आणि उद्धवसेनेचे गजानन मालपुरे यांनी केली आहे. सोमवारी मालपुरे यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह..
यावेळी बोलताना दीपककुमार गुप्ता म्हणाले की, मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता होती की नाही, हे तपासण्यासाठी आम्ही माहितीच्या अधिकारात सीसीटीव्ही फुटेज आणि फेरमतमोजणी अर्जांची माहिती मागवली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उमेदवारांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप..
गजानन मालपुरे यांनी निवडणूक प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धवसेनेच्या उमेदवारांनी जेव्हा नियमानुसार फेरमतमोजणीची मागणी केली, तेव्हा ती मागणी नाकारण्यात आली. इतकेच नव्हे तर, संबंधित उमेदवारांना मारहाण करण्यात आल्याचा दावाही मालपुरे यांनी केला आहे. लोकशाही मार्गाने मागणी करणाऱ्या उमेदवारांना झालेली वागणूक ही निंदनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी..
मतमोजणी केंद्रावर उपस्थित असलेल्या आणि उमेदवारांशी गैरवर्तन करणाऱ्या संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली. याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर दाद मागणार असल्याचेही गुप्ता आणि मालपुरे यांनी स्पष्ट केले.








