जळगाव, (प्रतिनिधी) : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाने आपली घोडदौड कायम ठेवली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १९ ‘अ’ मधून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रेखा चुडामण पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या विजयामुळे महापालिकेत शिवसेना शिंदे गटाची ही चौथी, तर महायुतीची एकूण पाचवी जागा बिनविरोध निवडून आली आहे.
प्रभाग १९ ‘अ’ मध्ये रेखा पाटील यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांनी माघार घेतल्याने हा मार्ग मोकळा झाला. निवडणूक निर्णय अधिकार्यांकडून अधिकृत घोषणा होणे बाकी असले तरी, रेखा पाटील यांची निवड आता निश्चित मानली जात आहे.
महायुतीचे पारडे जड..
या विजयामुळे जळगाव महापालिकेत मतदानापूर्वीच महायुतीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, यात शिवसेनेचे (शिंदे गट) ४ आणि भारतीय जनता पक्षाच्या १ उमेदवाराचा समावेश आहे.








