जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षानंतर आता शिवसेना (शिंदे गट) देखील आपला प्रभाव पाडताना दिसत आहे. प्रभाग क्रमांक १८ ‘अ’ मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांच्या विरोधातील एकमेव उमेदवाराने माघार घेतल्याने, त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हा विजय मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
चोपड्याचे आमदार प्रा. डॉ. चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार लता सोनवणे यांचे सुपुत्र असलेले डॉ. गौरव सोनवणे यांच्या रूपाने आता महानगरपालिकेत एक तरुण, तडफदार आणि उच्चशिक्षित नेतृत्व दाखल झाले आहे. प्रभाग १८ ‘अ’ मध्ये शिवसेनेने त्यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी आपला अर्ज दाखल केला होता. छाननी प्रक्रियेत दोन्ही अर्ज वैध ठरले होते, त्यामुळे येथे निवडणूक होणार अशी चिन्हे होती.
मात्र, गुरुवारी (१ जानेवारी) अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मयूर सोनवणे यांनी आपली माघार घेतल्याने डॉ. गौरव सोनवणे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. अधिकृत घोषणा होताच महानगरपालिकेच्या प्रांगणात शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जोरदार जल्लोष केला.
यावेळी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. अमृता सोनवणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “शहराच्या विकासासाठी आणि प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील,” असा विश्वास यावेळी डॉ. गौरव सोनवणे यांनी व्यक्त केला.








