जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीने आता उत्कंठेचा उच्चांक गाठला असून, राजकीय वर्तुळात तासातासाला नवनवीन घडामोडी घडत आहेत. महायुतीमधील जागावाटपाचे आणि आकड्यांचे समीकरण जुळल्याची चर्चा असली, तरी ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’ एकत्रित लढणार की भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा ‘स्वबळाचा’ नारा देणार, याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या सर्व प्रश्नांची अधिकृत उत्तरे उद्या मंगळवारी (दि. ३०) दुपारी १२ वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत मिळणार आहेत.
जागावाटपाचा तिढा सुटणार?
गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. काही महत्त्वाच्या प्रभागांवरून तिन्ही पक्षांनी दावा ठोकल्यामुळे चर्चा अंतिम टप्प्यात येऊन थांबली होती. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता हा तिढा सुटला असून मंगळवारच्या पत्रकार परिषदेत युतीचा अधिकृत फॉर्म्युला जाहीर केला जाईल.
उमेदवार यादीची उत्सुकता आणि बंडखोरीचे संकेत..
याच पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. भाजपने आधीच आपल्या इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज (फॉर्म) भरून तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, एकाच जागेसाठी अनेक इच्छुक असल्याने ज्यांना तिकीट मिळणार नाही, असे उमेदवार अपक्ष निवडणूक लढवण्याच्या किंवा थेट बंडखोरी करण्याच्या पवित्र्यात आहेत. यामुळे अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर पक्षांतर्गत हालचाली कशा राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकूणच, मंगळवारचा दिवस जळगावच्या स्थानिक राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार असून, महायुतीचे ऐक्य टिकणार की जळगावात तिरंगी-चौरंगी लढत होणार, हे स्पष्ट होईल.








