जळगाव, (प्रतिनिधी) : “भारताने अन्नसुरक्षेत स्वावलंबन मिळवले असले तरी आता पोषक मूल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन वाढवण्यासाठी मातीचे आरोग्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन आणि खतांचा कार्यक्षम वापर अनिवार्य आहे. शेतकरी, शास्त्रज्ञ आणि उद्योजकांच्या सामूहिक प्रयत्नातूनच या क्षेत्रात शाश्वत बदल घडेल,” असा विश्वास ‘नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रीकल्चर सायन्सेस’चे अध्यक्ष डॉ. हिमांशू पाठक यांनी व्यक्त केला.
जैन हिल्स येथील गांधीतीर्थमध्ये आयोजित ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’ (NCS-2025) च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर आणि जैन इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमातील महत्त्वाचे मुद्दे:
नवे वाण लाँच: जैन इरिगेशनतर्फे ‘जैन स्वीट ऑरेंज-६’ आणि ‘जैन मॅन्डरीन-१’ या दोन सुधारित वाणांचे अनावरण करण्यात आले. ‘जैन मॅन्डरीन-१’ हे वाण दुसऱ्या वर्षापासून उत्पादन देण्यास सक्षम आहे.
आव्हाने व उपाय: भारताचा लिंबूवर्गीय उत्पादनात जगात तिसरा क्रमांक लागत असला तरी हवामान बदल आणि कीड-रोगांचे मोठे आव्हान आहे. त्यावर मूल्य साखळी व्यवस्थापनाद्वारे मात करण्याचा संकल्प परिषदेत करण्यात आला.
आरोग्य आणि निर्यात: डॉ. एन. कृष्णकुमार यांनी सांगितले की, केवळ अन्नसुरक्षा पुरेशी नसून ‘पोषण सुरक्षा’ महत्त्वाची आहे. भारतीय लिंबूवर्गीय उत्पादनांना परदेशात मोठी मागणी असून निर्यात वाढवल्यास शेतकऱ्यांचा मोठा फायदा होईल.
पुस्तकाचे प्रकाशन: मान्यवरांच्या हस्ते ‘सिट्रस कल्टिवेशन गाईड’ आणि परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, डॉ. दिलीप घोष, डॉ. सुदर्शन अय्यंगार आणि विविध देशांतील शास्त्रज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमात जागतिक स्तरावरील तज्ज्ञांना फेलोशिप देऊन गौरविण्यात आले.
मान्यवरांचे पुरस्कार..
लिंबूवर्गीय परिषदेमध्ये फेलोशिप प्रदान करण्यात आली. त्यात डॉ. चंद्रिका रामादुगु (कॅलिफोर्निया विद्यापीठ, अमेरिका), डॉ. मंजुनाथ केरेमने (USDA, अमेरिका), डॉ. अवी साडका (वोल्कानी संस्था, इस्रायल), डॉ. शैलेंद्र राजन (माजी संचालक, ICAR-CISH), डॉ. एम. कृष्णा रेड्डी (माजी शास्त्रज्ञ, ICAR-IIHR), डॉ. अवतार सिंग (माजी शास्त्रज्ञ, IARI), डॉ. आकाश शर्मा (प्राध्यापक, SKUAST-जम्मू), डॉ. शिव शंकर पांडे (IASST, गुवाहाटी), डॉ. आर. एम. शर्मा (प्राध्यापक, IARI), डॉ. अवतार सिंग (माजी प्रिंसिपल सायंटिस्ट, ICAR), डॉ. आकाश शर्मा (शेर-ए-काश्मीर युनिव्हर्सिटी, जम्मू), डॉ. सुशंकर पांडे (DBT रामानुजन फेलो, आसाम), डॉ. आर्यन शर्मा (प्रोफेसर, IARI, न्यू दिल्ली) यांचा फेलोशिप देऊन गौरव करण्यात आला.
जैन इरिगेशनतर्फे दोन वाणांचे लॉन्चिंग..
जैन इरिगेशन सिस्टीम्स तर्फे लिंबूवर्गीय फळांमध्ये जैन स्वीट ऑरेंज-६ व जैन मॅन्डरीन-१ हे दोन वाण नव्यानेच विकसीत केले आहे. त्यांचे हेमचंद्र पाटील, शिवाजीराव चव्हाण, नवीनकुमार पेठे, अजित जोशी, संतोषकुमार पेठे, के. टी. रेड्डी, एन. श्रीधर, गोणकुंठा लेपाक्षी, व्ही. उमामहेश, बी. व्ही. रेड्डी. या दहा शेतकऱ्यांना ही दोघं वाणांची रोपं देऊन सत्कार करण्यात आला. जैन मॅन्डरीन-१ हे दुसऱ्याच वर्षी उत्पादन देणारं वाण असून ते नागपूर संत्राला उत्कृष्ट पर्याय ठरू शकते असे मत डॉ. मिलींद लधानिया यांनी सांगितले.








