जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांच्या प्रक्रियेत तांत्रिक कारणास्तव स्थगिती मिळालेल्या सहा पालिकांमधील ९ रिक्त प्रभागांसाठी शनिवारी (दि. २०) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव आणि पाचोरा या पालिकांचा यामध्ये समावेश असून, प्रशासनाने मतदानाची संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे.

नियोजित निवडणूक कार्यक्रमात काही ठिकाणी उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देताच निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले होते. या प्रक्रियेविरोधात न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते. परिणामी, संबंधित प्रभागांमधील निवडणुकांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. आता हा पेच सुटल्यानंतर या ९ जागांसाठी मतदान होत आहे.

शनिवार, २० रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान होईल. तर रविवार, २१ रोजी सकाळी १० वाजेपासून जिल्ह्यातील एकूण १८ पालिकांच्या मतमोजणीला एकत्रित सुरुवात होईल. मतदानासाठी आवश्यक असलेल्या ईव्हीएम मशीन (EVM), मतदान केंद्रांवरील कर्मचारी आणि सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे, कारण २१ तारखेला १८ पालिकांचा एकत्रित निकाल स्पष्ट होणार आहे.








