जळगाव, (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी ‘मनोरंजनातून शिक्षण’ ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. अनुभूती स्कूलने आयोजित केलेला ‘एड्युफेअर’ हा उपक्रम मुलांचे भविष्य घडवणारा असून, यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होत आहे, असे प्रतिपादन कोगटा इम्पोर्ट एक्सपोर्टचे अध्यक्ष प्रेम कोगटा यांनी केले. खान्देश सेंट्रल मॉलच्या मैदानावर अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे आयोजित ‘एड्युफेअर–२०२५’ या तीन दिवसीय शैक्षणिक व मनोरंजनात्मक महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १९) थाटात संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, क्रेडाईचे राज्य उपाध्यक्ष अनिश शहा, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य रश्मी लाहोटी, अंबिका जैन, अनिल जोशी, रूपाली वाघ, मनोज दाडकर, अरविंद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व पाहुण्यांनी आकाशात फुगे सोडून या उपक्रमाचे अनोख्या पद्धतीने उद्घाटन केले.

उद्योजक अनिश शहा यांनी एड्युफेअरचे कौतुक करताना सांगितले की, “देशाचे भविष्य विद्यार्थ्यांमध्ये दडलेले आहे. सायन्स, गणित, इंजिनिअरिंग किंवा इतिहास यांसारखे कठीण विषय मुले खेळता खेळता शिकत आहेत. अशोक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जाणारा हा उपक्रम जळगावकरांसाठी एक मोठी पर्वणी आहे.”
शून्य ते ९९ वयोगटासाठी खेळांची मेजवानी..
अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन यांनी आवाहन केले की, “पालकांनी मुलांच्या उत्साहाला दाद देण्यासाठी आवर्जून यावे. येथे शून्य ते ९९ वर्षे वयोगटातील कोणीही खेळू शकेल असे खेळ आहेत. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने याचा आनंद घ्यावा.”
‘एड्युफेअर-२०२५’ ची प्रमुख वैशिष्ट्ये:
▪️बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि भाषिक कौशल्यांवर आधारित विविध खेळ.
▪️इतिहासातील रोमन संस्कृतीचा जिवंत अनुभव देणारे प्रकल्प.
▪️अवघड प्रयोग आणि गणिते सोप्या पद्धतीने मांडणारी मॉडेल्स.
▪️विद्यार्थी आणि पालकांनी मिळून थाटलेली विविध खाद्यपदार्थांची दुकाने.
▪️पपेट शो, संगीत-नृत्य सादरीकरण, ६०० पेक्षा अधिक हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन.
▪️रणपा बैलगाडी सवारी, आरशांची दुनिया आणि ॲडव्हेंचर झोन.
एड्युफेअर, मेळावा २१ डिसेंबरपर्यंत दररोज सायंकाळी ४:०० ते रात्री ८:३० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला राहणार आहे.








