धरणगाव पंचायत समितीमधील कंत्राटी कर्मचाऱ्यावर एसीबीची कारवाई
जळगाव, (प्रतिनिधी) : पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुल बांधकामाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम बँक खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात १०,००० रुपये लाचेची मागणी करणाऱ्या धरणगाव पंचायत समिती येथील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी) आणि एका खाजगी इसमावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी गणेश संभाजी पाटील (वय ३१, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, कंत्राटी) आणि सागर शांताराम कोळी (वय ३०, खाजगी इसम, रा. निंभोरा, ता. धरणगाव) यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अन्वये ०३ डिसेंबर रोजी धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
तक्रारदार यांना सन २०२४-२०२५ या ब्लॉकमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. यापैकी १५,००० रुपयांचा पहिला हप्ता त्यांना मिळाला होता. मात्र, घराचे काम पूर्ण होऊनही दुसरा हप्ता जमा होत नसल्याने तक्रारदारांनी वारंवार पंचायत समिती, धरणगाव येथे चौकशी करत तक्रारदार हे गणेश पाटील यांना भेटले असता, पाटील यांनी दुसऱ्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा करण्यासाठी त्यांच्याकडे १०,००० रुपये लाचेची मागणी केली. यावर तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार दिली.
लाचेच्या मागणीची पडताळणी..
पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत, लोकसेवक गणेश पाटील यांनी तक्रारदाराकडे १०,००० रुपये लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर लोकसेवक पाटील यांनी खाजगी इसम सागर कोळी याच्या मोबाईल फोनवरून सदर लाचेची रक्कम त्याच्या मार्फत स्वीकारण्यास संमती दिली. तसेच, सागर कोळी यानेही लाचेची रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शवून या गुन्ह्याला प्रोत्साहन दिले. त्यामुळे या दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सापळ्याचे पर्यवेक्षण पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर, ला.प्र.वि., जळगाव यांनी केले. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांनी काम पाहिले. तर सापळा पथकात पोना बाळु मराठे, पोकों राकेश दुसाने, पोकॉ. प्रणेश ठाकुर, सचिन चाटे यांचा समावेश होता.








