जळगाव, (प्रतिनिधी) : विना परवाना वाळूची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाळू माफियांनी तलाठ्याची कॉलर पकडून त्यांच्या कानशिलात लगावली, शिवीगाळ केली आणि ‘टॉमी’ (दांडक्यासारखे शस्त्र) ने त्यांच्यावर हल्ला करत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला.
ही घटना सोमवार, दि. १ रोजी दुपारी साडेतीन वाजता खंडेराव नगरात घडली. पिंप्राळ्याचे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) राजू कडू बाऱ्हे (वय ५३) यांनी वाळूमाफिया मनोज रमेश भालेराव, फैजल खान आणि ट्रॅक्टर चालक यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली असून तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तलाठी राजू बाऱ्हे हे खंडेराव नगराकडून त्यांच्या कार्यालयाकडे जात असताना गणपती मंदिराजवळून एका विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाळूचा अवैध उपसा होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ट्रॅक्टर थांबवून चालकाकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली.
याच वेळी, यापूर्वी वाळू वाहतुकीची कारवाई झालेला आणि ट्रॅक्टर मालक असलेला मनोज भालेराव हा त्याचा मित्र फैजलसोबत दुचाकीवरून तेथे आला. त्याने तलाठी बाऱ्हे यांना दम दिला आणि “हे ट्रॅक्टर माझेच असून तुमचे नेहमीचेच झाले आहे,” असे म्हणत ट्रॅक्टर घेऊन जाण्यास सांगितले.
तलाठी बाऱ्हे यांनी ट्रॅक्टरला अडवून कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता, मनोज भालेराव याने त्यांच्या अंगावर धावून जात त्यांची कॉलर पकडली आणि त्यांच्या कानशिलात लगावली. तसेच, त्यांना ढकलून देत शिवीगाळ केली. मारहाण केल्यानंतर भालेराव याने त्याच वेळी “तुला मारुन टाकायला पाहिजे होते” असे म्हणत फैजल खान याला ‘टॉमी’ (शस्त्र) ने मारण्यास सांगितले. त्यानुसार फैजलने बाऱ्हे यांच्यावर टॉमीने हल्ला केला. सुदैवाने बाऱ्हे बाजूला सरकल्याने ते बचावले, मात्र याच संधीचा फायदा घेऊन चालक ट्रॅक्टर घेऊन पसार झाला.
यानंतर तलाठी बाऱ्हे यांनी सहकाऱ्यांना फोन केला. नागरिकांची गर्दी जमा होत असल्याचे पाहून वाळू माफियांनी घटनास्थळावरून पळ काढला. या गंभीर घटनेमुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्राम महसूल अधिकारी बाऱ्हे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.








