जळगाव, (प्रतिनिधी) : संत ज्ञानेश्वर विद्यालयात एड्स विषयी जनजागृती करण्यासाठी ‘रेड रिबीन क्लब’ या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे. या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थी आणि समाजात आरोग्य जागरूकता आणि भेदभाव निर्मूलनाचा संदेश पोहोचवला जाईल.
विद्यालयातील आठवी, नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांची या क्लबचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. तरुण पिढीला सामाजिक जबाबदारी आणि आरोग्यविषयक योग्य माहिती देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. ’रेड रिबीन क्लब’च्या अध्यक्षपदी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांची निवड करण्यात आली आहे. तसेच, क्लबचे समुपदेशक आणि मार्गदर्शक म्हणून डॉ. उमेश पाटील यांनी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली क्लब वर्षभर विविध उपक्रम राबवणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमात सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपल्या शर्टवर लाल रिबीन लावून एड्स जनजागृतीचा आणि सहअस्तित्वाचा संदेश दिला. ‘लाल रिबीन’ हे एड्स जनजागृती, सहअस्तित्व आणि समाजात भेदभावमुक्त वातावरणाचे प्रतीक असल्याचे महत्त्व यावेळी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
‘रेड रिबीन क्लब’ च्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर विद्यालयात वर्षभर विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत यात आरोग्य जागरूकता आणि एड्सविषयी योग्य माहिती पोहोचवणे, समाजातील भेदभाव निर्मूलन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, जनजागृती रॅली, पोस्टर स्पर्धा आणि समुपदेशन कार्यक्रम घेतले जाणार आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये एड्सबद्दलची भीती कमी होऊन योग्य माहिती मिळाल्याने समाजात एक सकारात्मक बदल घडून येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.








