जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील अयोध्यानगर परिसरातून ‘धूम’ स्टाईलने दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावून नेली. मात्र, हा चोरीचा प्रयत्न यशस्वी झाला नाही कारण ही पोत सोन्याची नसून ती अवघ्या काही रुपयांची बेन्टेक्स (कृत्रिम दागिना) असल्याने महिलेने पोलिसांत तक्रार देण्याचे टाळले. या चोरीच्या घटनेतील रेकॉर्डवरील दोन आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

ही घटना २४ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अयोध्यानगरमध्ये घडली. स्वाती अनिल इंगळे (रा. अयोध्यानगर) या त्यांच्या घरासमोर दुचाकी लावून गेट उघडत होत्या. याच संधीचा फायदा घेत, मागाहून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांपैकी एकाने क्षणात महिलेच्या गळ्यातील पोत ओढली आणि दोघांनीही तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला.

सीसीटीव्हीत चोरटे कैद..
पोत चोरीची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ महिलेशी संवाद साधला असता, त्यांनी चोरीला गेलेला दागिना बेन्टेक्सचा (नकली) असल्याचे स्पष्ट केले आणि त्यामुळे तक्रार दाखल करण्यास नकार दिला. तरीही पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पोत चोरी करणारे ते दोन्ही चोरटे कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले आहेत.
फुटेजवरून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची ओळख पटली आहे. पोत नकली असल्याने आर्थिक नुकसान टळले असले तरी, शहरात चोरट्यांची सक्रियता पाहता, एमआयडीसी पोलीस आता या रेकॉर्डवरील आरोपींचा कसून शोध घेत आहेत.







