अमळनेर, (प्रतिनिधी) : अमळनेर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परीक्षीत बाविस्कर यांच्या बाजूने जोरदार प्रचार केला आहे. अमळनेर ही संतांची भूमी असून, या शहराला चारित्र्यसंपन्न, अभ्यासू आणि प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
चौधरी यांनी नमूद केले की, डॉ. परीक्षीत बाविस्कर हे उच्चशिक्षित, मूळचे अमळनेरकर असून त्यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ आहे. विरोधक त्यांच्या जळगाव येथील वास्तव्याबद्दल उपस्थित करत असलेले प्रश्न दिशाभूल करणारे आहेत. कारण, आमदारांच्या पत्नीसुद्धा याच प्रभागात डॉ. बाविस्कर यांच्या कुटुंबाकडून मते मागत आहेत. डॉ. बाविस्कर हे नम्र आणि जनतेशी जोडलेले व्यक्तिमत्त्व असून, त्यांच्या कुटुंबाचा समाजकार्यातील ठसा अमळनेरमध्ये सर्वश्रुत आहे.
’लचका तोडणारा’ नगराध्यक्ष नको..
माजी आमदार चौधरी यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची जबाबदारी स्पष्ट करताना म्हटले की, नगराध्यक्ष हा २४ तास लोकांसाठी उपलब्ध असणारा, शहराचे प्रश्न समजून घेणारा आणि विकासाला दिशा देणारा असावा. नगरपालिका हे जनतेची सेवा करण्याचे पवित्र व्यासपीठ आहे, जनतेची लूट, कुटनीती, भ्रष्ट व्यवहार आणि स्वार्थी उद्योग करण्याचे नाही. यावेळी, त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या प्रामाणिकतेवर आणि २४ तासांच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह उभे केले. विरोधात असलेल्या उमेदवारांनी केलेले ‘उद्योग’ अमळनेरकरांना माहीत आहेत, त्यामुळे २ डिसेंबर रोजी जनता योग्य उत्तर देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विकासाचे नवे पर्व..
शिरीष चौधरी यांनी डॉ. बाविस्कर यांना उमेदवारी देताना त्यांच्या अभ्यासू आणि खऱ्या अर्थाने लोकसेवक असलेल्या व्यक्तिमत्त्वाची दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेरला विकासासाठी महत्त्वाचा निधी मिळून शहरात विकासाचे नवे पर्व सुरू होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. अखेरीस, अमळनेरकर यावेळी प्रामाणिकता आणि विकासाला मतदान करून २ डिसेंबर रोजी इतिहास घडवतील, असा निर्धार शहरवासीयांनी केल्याचे त्यांनी सांगितले.







