जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील शिवराम नगर येथील माजी मंत्री आणि आमदार एकनाथराव खडसे यांच्या ‘मुक्ताई’ निवासस्थानी झालेल्या हाय-प्रोफाईल घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात जळगाव पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. रामानंद नगर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने कारवाई करत चोरीतील ६ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दि. २७ ते २८ ऑक्टोबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोंडा तोडून ही घरफोडी केली होती. या घरफोडीत एकूण ६,७०,०००/- रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने, चांदीची गदा, त्रिशूल, तलवार, रथ आणि रोख रक्कम चोरी झाली होती. घराची देखभाल करणारे चेतन सुरेश देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास आणि आरोपींना अटक..
पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ (रामानंद नगर) आणि पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या पथकांनी तपास सुरू केला.
पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे चोरट्यांनी वापरलेली दुचाकी शोधून काढली. वाहन मालक जियाउददीन हुस्नोददीन शेख (वय-३९, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) याला विचारणा केली असता, त्याने मुंबई येथील आपल्या तीन नातेवाईकांनी हा गुन्हा केल्याची माहिती दिली. जियाउददीन याला गुन्ह्यात मदत केल्याप्रकरणी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी अटक करण्यात आली.
मुख्य आरोपींचा शोध घेत असताना, चोरीचा मुद्देमाल उल्हासनगर येथील एका सोनाराकडे विक्री झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चिराग इकबाल सैय्यद (वय-२२, रा. उल्हासनगर) याला ताब्यात घेतले. त्याने विक्री केलेला मुद्देमाल कल्याण येथील सोनार कैलास हिराचंद खंडेलवार (वय-४८, रा. कल्याण) याच्याकडून हस्तगत करण्यात आला. या दोघांनाही ०३ नोव्हेंबर २०२५ रोजी अटक करण्यात आली.
जप्त केलेला मुद्देमाल
अटक केलेल्या आरोपी कडून पोलिसांनी सोन्याचे दागिने (६,००,०००/- रु. किमतीचे) आणि चांदीची मूर्ती (२१,०००/- रु. किमतीची) असा एकूण ६,२१,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सोन्याची लगड, रिंग्ज, कर्णफूल आणि चांदीची गणपती मूर्ती यांचा समावेश आहे.
फरार आरोपींचा शोध सुरू..
गुन्ह्यातील मुख्य आरोपी १) मोहम्मद बिलाल उर्फ बिल्ला अब्दुल करीम चौधरी, २) एजाज अहमद उर्फ सलीम अब्दुल चौधरी, आणि ३) बाबा (पूर्ण नाव माहीत नाही) (सर्व रा. उल्हासनगर, मुंबई) यांचा शोध घेण्यासाठी पथके मुंबईत कार्यरत आहेत. यातील आरोपी एजाज अहमद याच्यावर माटुंगा, व्हिपी रोड, नारपोली, ताडदेव, नवपाडा वापी अशा विविध पोलीस स्टेशनमध्ये चोरी आणि घरफोडीचे सुमारे २० गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपनिरीक्षक सचिन रणेशवरे (रामानंद नगर) पुढील तपास करीत आहेत.










