जळगाव, (प्रतिनिधी) : भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गाजलेल्या ₹२५.४२ लाख रुपयांच्या सनसनाटी लुटीचा छडा लावण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या ४८ तासांत यश आले आहे. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार फिर्यादी ज्या ‘रॉयल कंपनीत’ नोकरी करतात, त्याच कंपनीचा चालक शाहीद बेग असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी शाहीद बेगसह एकूण सहा (०६) आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून लुटीच्या रकमेपैकी ₹२३,४२,०००/- रोख आणि तीन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.
गुन्ह्याची पार्श्वभूमी:
दि.२८ रोजी रात्री सुमारे १०:२० वाजता फिर्यादी मोहम्मद यासीन ईस्माइल हे त्यांच्या कार्यालयातील ₹२५,४२,०००/- असलेली पैशांची बॅग मोटारसायकलवरून घेऊन घरी जात होते. मौजे खडके शिवारातील सत्यसाई नगरकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर, तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या चालत्या मोटारसायकलला धक्का दिला आणि त्यांचा तोल गेल्यावर पेट्रोल टाकीवर ठेवलेली पैशांची बॅग बळजबरीने हिसकावून पोबारा केला होता.
ड्रायव्हरनेच दिली ‘टीप’!
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासात फिर्यादीचा चालक शाहीद बेग याच्यावर संशय बळावला. कसून चौकशी केल्यावर शाहीद बेगने गुन्ह्याचा कट रचल्याची कबुली दिली. शाहीद बेग हा फिर्यादीच्याच कंपनीत ड्रायव्हर असल्याने, त्याला पैसे ने-आण करण्याच्या वेळेची माहिती होती. त्यानेच अकाऊंटंट असलेले फिर्यादी यासीन शेख यांच्याकडे पैसे असल्याची ‘टीप’ त्याचे साथीदार मुजाहीद मलीक आणि मोहम्मद दानिश यांना दिली.
मुजाहीदने हा प्लॅन रावेर तालुक्यातील रसलपूर येथील अजहर फरीद मलक, अमीर खान यूनुस खान आणि इजहार बेग इरफान बेग यांना सांगितला. या तिघांनी घटनेच्या रात्री प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन लुटीचा गुन्हा केला. तपासात आरोपींनी संगनमत करून कट रचून दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाल्याने, गुन्ह्यात दरोड्याचे वाढीव कलम लावण्यात आले आहे.
पोलिसांनी दि. ३१ रोजी सर्व ०६ आरोपींना अटक केली आहे. अटकेतील आरोपींमध्ये शाहीद बेग इब्राहिम वेग (२५, रा. भुसावळ) – (मुख्य सूत्रधार), मुजाहिद आसीफ मलौक (२०, रा. भुसावळ), मोहम्मद दानिश मोहम्मद हाशीम (१९, रा. भुसावळ), अजहर फरीद मलक (२४, रा. रसलपूर, ता. रावेर), अमीर खान युनुस खान (२४, रा. रसलपूर, ता. रावेर), ईजहार बेग इरफान बेग (२३, रा. रसलपूर, ता. रावेर) यांचा समावेश आहे. आरोपींपैकी शाहीद बेग आणि अमीर खान यांच्यावर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
आरोपींकडून लुटीच्या रकमेपैकी ₹२३,४२,०००/- जप्त करण्यात आले असून, उर्वरित ₹२ लाख आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करायची आहे. सखोल तपासासाठी न्यायालयाने सर्व आरोपींना दि.०३ नोव्हेंबर रोजी पावेतो पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड (स्था.गु.शा.), पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस निरीक्षक महेश गायकवाड (भुसावळ तालुका पो.स्टे.) आणि त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली.








