चाळीसगाव, (प्रतिनिधी) : शनिवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मन्याड मध्यम प्रकल्प आणि गिरणा मोठ्या प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने दोन्ही धरणांतून पाण्याचा विसर्ग लक्षणीयरीत्या वाढवला असून, नदीकाठच्या नागरिकांना ‘हाय अलर्ट’चा इशारा दिला आहे.
मन्याड प्रकल्पातून ३०००० क्युसेक्सपर्यंत विसर्ग..
मन्याड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. मन्याड धरणावरील असलेल्या माणिकपुंज प्रकल्पातून सुमारे २८००० ते ३०००० क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातील पाऊस सुरू असल्याने मन्याड नदीत पाण्याचा मोठा प्रवाह येत आहे.
मन्याड नदीकाठच्या नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी जाण्याचे, तसेच आपले पशुधन, शेतीमधील मोटार पंप, गुरेढोरे आणि चीज वस्तू सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश पाटबंधारे उपविभागाने दिले आहेत. जेणेकरून कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.
गिरणा प्रकल्पाचा विसर्ग ५१९९६ क्युसेक्सवर..
पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव अंतर्गत असलेल्या गिरणा प्रकल्पात पाण्याची वाढती आवक पाहता, आज दि.२८ रोजी दुपारी ४:०० वाजता विसर्ग आणखी वाढवण्यात आला आहे. गिरणा प्रकल्पाचा विसर्ग ४४५६८ क्युसेक्सवरून वाढवून थेट ५१९९६ क्युसेक्स (१४७१.४९ क्युमेक्स) करण्यात आला आहे.
पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांच्या उपविभागीय अभियंत्यांनी याबाबत माहिती दिली असून, गिरणा नदीत पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला आहे. प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास किंवा कमी झाल्यास विसर्गामध्ये बदल करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि नदीपात्रात किंवा किनारी जाण्याचे धाडस करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.