जळगाव, ( प्रतिनिधी) : महानगरपालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी विजय घोलप यांच्यावर महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन आणि लैंगिक छळाचे गंभीर आरोप माजी नगरसेवक प्रशांत सुरेश नाईक यांनी केले आहेत. घोलप यांना तत्काळ मनपा सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी नाईक यांनी मनपा आयुक्त यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच, मनपा विशाखा समितीची बैठक ‘इन कॅमेरा’ (In Camera) घ्यावी, असेही त्यांनी सुचवले आहे.
नाईक यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, घोलप यांनी एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यासोबत लैंगिक छळ केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या प्रकरणी घोलप यांनी दि. ०७/०७/२०२५ रोजी नोटरीद्वारे लेखी माफीनामा दिला असून, त्यात त्यांनी आपल्या गैरकृत्याची कबुली दिली आहे. मात्र, नंतर दबाव आल्याने पीडित महिलेने तक्रार मागे घेतल्याचे नाईक यांनी नमूद केले. पत्रात नाईक यांनी घोलप यांच्या मागील गैरकृत्यांचाही उल्लेख केला आहे. यापूर्वी चेतनदास मेहता रुग्णालयात असताना त्यांनी एका महिला परिचारिकेसोबत गैरवर्तन केल्याने तिला नोकरी सोडावी लागली होती. तसेच, २०१६ मध्येही एका महिला कर्मचाऱ्याशी अश्लील गैरकृत्य केल्याप्रकरणी त्यांच्या दोन वेतनवाढी रोखण्यात आल्या होत्या. याशिवाय, जन्म-मृत्यू विभागात कार्यरत असताना आणि छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात बदली झाल्यानंतरही त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप आहेत.
या सर्व गंभीर बाबी लक्षात घेता, घोलप यांची सखोल चौकशी करून त्यांना मनपा सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी प्रशांत नाईक यांनी केली आहे. तसेच, महिला तक्रार निवारण समितीतील दबाव आणणाऱ्या सदस्यांवरही कारवाई करण्याची विनंती त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.