मुक्ताईनगर, (प्रतिनिधी) : येथील पुरनाड पुलाचे काम आज मंगळवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. यामुळे संतप्त झालेले आमदार चंद्रकांत पाटील यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू करताच त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुक्ताईनगर-पुरनाड फाटा दरम्यानच्या इंदूर राष्ट्रीय महामार्गाचे काम आज सकाळी पोलीस बंदोबस्तात सुरू झाले. या महामार्गाच्या कामात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या असून त्यांना अद्याप योग्य मोबदला मिळालेला नाही. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी काम बंद पाडण्यासाठी आंदोलन पुकारले. पोलिसांनी बळाचा वापर करत शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काम थांबवण्याची मागणी लावून धरली.
मात्र, प्रांत अधिकाऱ्यांनी काम सुरूच राहील अशी भूमिका घेतल्याने आमदार पाटील अधिकच संतापले आणि त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. अधिकाऱ्यांनी विनंती करूनही आमदारांनी आंदोलन मागे न घेतल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकरी आणि प्रशासनातील हा वाद अधिकच चिघळत असल्याचे चित्र आहे.